वानखेडे मैदानात शाहरुख आणि सुरक्षा कर्मचाऱ्यात काय वाद झाला होता? 12 वर्षांनी KKR च्या डायरेक्टरने केला खुलासा, 'त्याच्या मुलीला...'

IPL 2024: आज वानखेडे (Wankhede) मैदानात कोलकाता (KKR) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आमने-सामने असणार आहेत. कोलकाता संघ सध्या 12 गुणांसह वरच्या स्थानावर असल्याने त्यांना फार चिंता करण्याची गरज नाही. मुंबई इंडियन्स संघ मात्र 6 गुणांसह 10 व्या स्थानावर असून स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान वानखेडे मैदान आणि कोलकाता संघचा जुना इतिहास आहे. वानखेडे मैदानात कोलकाता संघाचा मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सुरक्षा कर्मचाऱ्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. या वादानंतर शाहरुख खानवर वानखेडेत बंदी घालण्यात आली होती. पण तेव्हा नेमकं काय झालं होतं याचा खुलासा कोलकाता (KKR) संघाच्या माजी संचालकांनी 12 वर्षांनी केला आहे. 

शाहरुख खान आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुरक्षा कर्मचाऱ्यात त्यावेळी मोठा वाद झाला होता. शाहरुख खान सुरक्षा कर्मचाऱ्यावर संतापल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर शाहरुख खानवर 5 वर्षांची बंदी घातली होती. तीन वर्षांनी अखेर ही बंदी हटवण्यात आली होती. 

स्टेडियमचे व्यवस्थापन करणाऱ्या एमसीएने आरोप केला होता की, शाहरुखने सामना संपल्यानंतर जबरदस्तीने मैदानात जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला थांबवल्यानंतर सुरक्षारक्षकांना शिवीगाळ आणि मारहाण केली. शाहरुखवर बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीने घेतला होता.

शाहरुख खानने मात्र आपली बाजू मांडताना आपल्या मुलांना सुरक्षारक्षकांनी सुरक्षेच्या नावाखाली शारिरीक धक्काबुक्की केल्याने संतापलो होतो असा दावा केला होता. शाहरुख खानविरोधात पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली होती. पण हा अदखलपात्र गुन्हा असल्याने शाहरुखला अटक करण्यात आली नाही.

दरम्यान आता कोलकाता संघाचे माजी संचालक जॉय भट्टाचार्य यांनी पुन्हा एकदा तेव्हा नेमकं काय झालं होतं हे सांगत तो वाद उकरुन काढला आहे. एक्सवर त्यांनी पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, "केकेआरने मागच्या वेळी वानखेडेत मुंबईचा पराभव केला तेव्हा मी डगाऊटचा भाग होतो. त्याला बराच वेळ झाला आहे, पण आज त्यावर बोलू शकतो. केकेआरने त्या घटनेनंतर दोनवेळा चॅम्पिअनशिप जिंकली. त्याने काही छळ केला नव्हता. मी तिथेच होतो. पुढील वेळी जेव्हा तुमच्या तरुण मुलीला धक्काबुक्की करेल तेव्हा शांत राहा".

दरम्यान या घटनेनंतर आयपीएलमध्ये बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. केकेआरने दोन वेळा स्पर्धा जिंकली. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने 5 वेळा स्पर्धा जिंकली आहे. 

2024-05-03T13:48:03Z dg43tfdfdgfd